गुरुवार, ८ मार्च, २०१२

आपलं आपलं सोनं






लहानपणीचे पाठांतर विसरत चाललो आहे याचा साक्षात्कार झालं. निमित्त झाले Bombay Natural History Society ने आयोजित केलेल्या एका जंगल भ्रमंतीचे. 'आता जंगल हिरवे असेल का?' असं प्रश्न अश्विनीने केला. 'जाऊन तर बघतो' माझं  उत्तर. 'सध्या कुठला ऋतू चालू आहे?' तिने विचारले . 'थंडी आहे म्हणजे पानं गळून पडत असतील.' उत्तर नक्की आठवत नसल्याने मी गोलमाल उत्तर दिले. 'तसे नाही...ऋतू कोणता?'  ती ही महा चिकाटीची. बहुतेक गेल्या नऊ वर्षात तिने मला ओळखले आहे. बराच विचार करून म्हटले ' बहुतेक शिशिर' . मग इतर ऋतू कुठले म्हणून आठवून पाहू लागलो. वसंत, वर्षा, ग्रीष्म  लगेच आठवले. तोड प्रयत्न करून 'हेमंत' ही आठवला. सहावा ऋतू कोणता ? बराच वेळ विचार केला आठवेना..असं कसा विसरतोय म्हणून मराठी महिने तरी आठवतात का हे पाहू लागलो. शेवटी नाद सोडला आणि वर्तमान पत्र  वाचू लागलो. आणि अचानक आठवले. " शरद" हे नाव मुळात एका ऋतूचे आहे.

पक्षिमित्र संघटने बरोबर गेलो असताना झालेला एक मित्र, अद्वैत पण या भ्रमंतीला येणार होता. त्यानेच मला या कार्यक्रमाची माहिती दिली. शनिवारी काही कार्यक्रम अचानक उगवले आणि त्या मुळे काही कार्यक्रम रद्द करावे लागले. असो निदान रविवार सकाळ तरी सत्कारणी लागावी अशी प्रार्थना करत होतो.
फिल्म सिटी च्या प्रचंड आवारात BNHS या एका सर्वात जुन्या संस्थेला मोठे आवार दिले आहे. इथेच Conservation Education Centre ची इमारत आहे आणि बाकीचा प्रचंड मोठ्या भूभागावर कृत्रिमतेचा कुठलाही लवलेश नसलेले दाट जंगल आहे. भल्या सकाळी पोहोचलो  तर अजून ५०-६० लोकांची गर्दी  जमलेली. BNHS नावामुळे एकदम हाय फाय क्राऊड जमला होता. 

 'अरे यार इध सब सूखा है ! क्या दिखायेंगे येह लोग ?' अश्या उद्गारांनी स्वागत झाले. जंगल हिरवे असेल तरच छान  दिसते हा एक समज. असं थोडं आहे?
नटली की छान दिसते  म्हणून घरातल्या स्त्री ला कुणी चोवीस तास जरीच्या साडीत नटून बसायला कुणी सांगते का? दूर दर्शन  वरच्या मालिकांचा अपवाद समजा. आवडती व्यक्ती तर कुठलाही साज शृंगार न करता पण  छान दिसते. लोक पानगळीचा मौसम बघायला खास युरोपात जातात . आपण निदान इथे तरी पहावा म्हणून मी  गेलो होतो .

एका सुकलेल्या ओढ्यातून  आम्ही जाऊ लागलो. हा तिथला पाणवठा असल्याने बिबट्याचा संचार त्या भागात  रात्री असतो . आमच्या मार्ग दर्शकाने तिथे असणारे दोन तीन पाईप दाखवून सांगितले की एकदा तिथे एक बिबट्या त्यांच्या तीन पिलांसह दिसला होता. त्या बरोबर रिकाम्या पाईपचे फोटो काढण्या साठी अहमहमिका लागली. कुणाला कसले फोटो काढायला आवडतील काही सांगता येत नाही. माझ्या बरोबरचे काही जण  मोठाल्या लेन्सचे क्यामेरे घेऊनही एकही फोटो घेत नव्हते. तर काही जण रिकाम्या पाईपलाही सोडत नव्हते .  

सकाळचा सूर्य प्रकाश ओढ्यावर पसरला  आणि भल्या सकाळची वेळ फोटोग्राफी साठी का चांगली असते ते  कळले. तिरका सूर्य प्रकाश आमच्या ग्रुप वर पडून एक मस्त फोटो मिळाला. तसाच जाताना एका झाडाच्या पिकत चाललेल्या लाल पिवळ्या पानांवरही सूर्य प्रकाशाने अद्भुत किमया केली होती. दोन्ही फोटो मी खाली टाकले आहेत. वाळकी पाने, खोडापासून  सुटलेल्या साली,  गळून पडलेली फुले, वठलेले पांढरे 'घोस्ट ट्री' (यांना मराठी मध्ये 'कान्डोल'  असे नाव आहे) ,    कारवीच्या काड्या, वाळक्या पानभोवती कोळ्यांनी विणलेली जाळी असं सगळा शिशिराचा मस्त नजारा, खुश करणारा होता. 

पक्ष्यांच्या आवाजावरून ते कुठे आहेत याचा अंदाज घेत घेत आम्ही उंचावरच्या सलीम अली point पाशी पोहोचलो. तिथून दूरवर विहार तलाव दिसत होता. पण  त्या  शांततेचा आनंद  घेता येण्यची शक्यता दिसत नव्हती कारण  आमच्या बरोबर असलेला महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांचा एक गट कट्ट्यावर बसल्या सारखा कोकलत होता. शेवटी आम्ही काही जण भरभर पुढे निघालो...परतताना एकाने आठवण सांगतली कान्हा राष्ट्रीय उद्यानाची ..त्यांच्या समोरून राजेशाही वाघ चालत येत होता आणि शेजारच्या गाडीतून ' ढोकळा खावानु? खाकरा आपजो ' चा कोलाहल चालू होता...सोनं सोडून चिंधीच्या मागे लागणं ते हेच ...असो, आपण आपलं सोनं शोधायचं  ....
Kaaravi ...queen of sahyadri....blossoms every seven years
see the magic of sun light....

1 टिप्पणी: