मंगळवार, १० जानेवारी, २०१२

एक झकास रविवार...


Water Lilly....hmm thats why ppl name their gorgeous ones as Lilly
 

माझा आणि पक्ष्यांचा संबध फारसा नाहीच. कॉलेज मध्ये असताना वर्गातला जे डी जोशी मला कधीतरी " कावळा आहेस " असा टोमणा मारायचा. कांदिवलीत आल्यापासून माझ्या साठी गाडीवर शिटून ठेवणारे कावळे आणि रस्त्यावर भाविक लोकांनी टाकलेले सडके मक्याचे दाणे खाऊन   दिवस भर खिडकीत घुमत बसणारी कबुतरं अश्या पक्ष्यांच्या दोनच  जाती उरल्या आहेत. त्या मुळे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पक्षिमित्र संघटनेने पक्षी निरीक्षण आयोजित केले आहे अशी माहिती अश्विनीच्या मैत्रिणीने,  दिपाली पेंडसेने  देताच मी रविवारचा कार्यक्रम ठरवून टाकला. दुसरेही  कारण होते ते म्हणजे नवी १८-२०० ची लेन्स आणि पक्ष्यांचे फोटो काढण्याचा सराव .

पावसाळ्यात मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाने याच जंगलात पद भ्रमणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या मुळे या वेळीही बरेच लांब जंगलात जावे लागेल अशी अपेक्षा होती. सक्काळी साडे सात वाजता जवळपास शे दीडशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर आम्ही १०-१५ जण आणि संघटनेचे उत्साही कार्यकर्ते जमलो. जमलेल्या क्राउड  मधेच पोरांचे 'bird watching' चालू झाल्याचे पाहून मलाही आमचे कॉलेज चे दिवस आठवले ..(हम्म.... गेले ते दिवस आणि उडाले ते पक्षी...)

छोटे छोटे समूह करून आम्ही पांगलो.  प्रवेश द्वारापासून अगदी शंभर मीटर अंतरावरच नदी काठी असलेल्या एक खुल्या जागी आम्ही थांबलो. सोबत असणारे मार्गदर्शक पक्ष्याच्या आवाजाचा अंदाज घेत आम्हाला झाडे दाखवू लागले. पक्षीनिरीक्षणाची सर्वात उत्तम वेळ सकाळची कारण या वेळी पक्ष्यांच्या हालचाली मंद असतात. पक्ष्यांचा वेध  घेणे मला तितके सोप्पे गेले नाही. पण आमच्या गटामध्ये तीन चार जण नेहेमीच पक्षीनिरीक्षण करणारे होते. त्यांना मात्र धडाधड पक्षी दिसत होते. एक तर सगळे पक्षी इतके लांब होते की माझी लेन्स तोकडी पडत होती. त्या मुळे पक्ष्यांचे फारसे स्पष्ट फोटो आले नाहीत.  त्यांची वैशिष्टे , वेगळेपण ओळखायचे तर बराच सराव हवा. एक बरे झाले की ३-४ जण सराईत पक्षी निरीक्षक असल्याने बाकीच्या लोकांना ते पक्षी दाखवत होते, त्यांची माहिती देत होते. " माहितगार " या शब्दाचा खरा अर्थ मला तिथेच ध्यानात आला. ज्यांच्या माहितीच्या धबधब्याने आपण गार पडतो तो माहितगार अशी मी नवी व्याख्या करून टाकली.

कोतवाल, भारद्वाज, मैना, साळुंख्या,   खंड्या (आता हा पक्षी माहिती नसल्यास तो 'किंगफिशर' चा कॅन पुढच्या वेळी नीट पहा ), पाण -कावळा , पाण-कोंबडी , इग्रेट,हळद्या  असे नेहमीचे आणि काही नाव माहित नसलेले पक्षी आणि माझ्या डोक्यावरून गेलेली अनेक  नावे..जवळपास वीसेक पक्षी आम्ही दोन तासात पाहिले. 'पागोडा' मुंग्यांनी झाडावर बनवलेली घरटी..होय होय चक्क घरटी, पाण  साप, खंड्याची मासेमारी सुद्धा पाहिली. आपल्यासाठी सगळे छोटे पक्षी म्हणजे चिमण्या. पण निरीक्षकांचे तसे नव्हते...त्याची शेपूट वर असेल तर नर, पोटावर ठिपका  असेल तर  जात वेगळी, साधं फोटो काढताना मी म्हणालो ' कमळ छान  उगवले आहे' , लगेच मला दुरुस्त केले...अहो ती वाटर लिली आहे कमळ नाही....पण असे बारकावे समजून घेताना मजा येते राव...नाही तर काय  सब घोडे बारा टके .

आम्ही बाहेर उद्यान उघडण्याची वाट बघत असताना एका आजोबांनी कशासाठी जमला आहात अशी चौकशी केली. "पक्षी निरीक्षण' असे ऐकताच ते म्हणाले 'आम्ही तर इथे अनेक वर्षे मॉर्निंग वॉक साठी येतो आहोत. आम्हाला तर कधी दिसले नाहीत. तुम्हाला कुठून दिसणार ? '. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला प्रव्श्द्वारापासून जवळच, नेहेमीच्या डांबरी रस्त्यापासून फक्त २०-२५ फुट अंतरावर असणाऱ्या पायवाटे वरच  आम्हाला हा खजिना सापडला. मला इंदोर आठवले. आमच्या घर पासून जवळच एक शेतकी महाविद्यालय होते. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बंगल्याच्या  आवारात  एकावेळी दहा दहा मोर नाचताना दिसायचे. एकदा मी केलेले  शूटिंग सी डी मध्ये कॉपी करण्या साठी आमच्याच कॉलनी मध्ये दिले. तो माणूस हे सगळे शुटींग बघून चकित झाला. जेव्हा मी त्याला सांगितले की हे सगळे दृश्य इथून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर बघायला मिळते तेव्हा तो वेडाच व्हायचा बाकी होता. इतकी वर्षे तिथे राहून सुद्धा तो स्वर्गीय आनंदाला मुकला होता. पक्षी निरीक्षणाच्या प्रसंगाने एक सत्य पुनः अनुभवास आले...थोडी चाकोरीची वाट सोडली तर अनुपम सौंदर्य आणि अपरिमित आनंद तुमची वाट बघत असतो...

white breasted kingfisher

The guy in the corner is maintaining the boats...something rare


 <><>
<>
<><>
Could not resist to capture the reflection