गुरुवार, ७ जुलै, २०११

एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया

नीता वोल्वो मध्ये मला एक इन्व्हेस्टमेंट आयडिया सुचली. आता कुणाला कुठे काय सुचावे याला काही नियम नाहीयेत...न्यूटन ला झाडाखाली बसून डुलक्या काढताना गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचला , कुणाला तरी दुपारच्या झोपेत असताना बेन्झीन च्या अणूची संरचना दिसली माझ्या एका मित्राला तर पोट मोकळे करताना नाटकाची कथाबीजे सापडायची...(जास्ती तपशील माहित नाहीत..विचारू नका ). त्याला आम्ही मित्र त्याला ' विधी- ज्ञ  ' म्हणायचो   .

झालं असं की पुण्याहून मुंबई ला येताना नीताची गाडी हा एक बरं पर्याय वाटतो. एकदा गाडीमध्ये बसला की नीता वोल्वो संपूर्ण पुणे, बावधन आणि औंध दर्शन करत म्हमईला नेते. गाडीत सामान टाकायचे आणि कोथरूडला डोळे  मिटून  बसले की मस्त डुलकी लागते तासा दीड तासाने डोळे उघडले की गाडी मॉलला उभी असते. कुठले तरी मोझार  बायर च्या २५ रुपयेवाल्या सी डी तले अजय देवगण  आणि तत्सम  इसमांचे  हिंस्त्र  चित्रपट  बघण्या  पेक्षा झोप  तरी नीट  होते . त्या  दिवशी  मात्र  मी  , अश्विनी   आणि सलील  गाडीत बसलो . आणि काही  सेकंदातच  मागे  बसलेली  मुलगी  फोन  वर  बोलू  लागली . सामान्यतः  गाडीत बसल्यावर  फोन करणे  यात  काही  विशेष  नाही . पुण्याच्या  भयंकर  रहदारीतून  माणसाला  गाडी  मिळाली  हे  घरी  कळवलेच   जाते . त्यामुळे  नेहेमीचा  फोन  असेल म्हणून माझे लक्ष गेले नाही.

आवाजाचे आणि माझे वाकडे नाही. संगमनेरला असताना आमच्या इमारतीमध्ये एक पंजाबी कुटुंब राहायचे . त्यांच्याकडे चोवीस तास रेडिओ नाही तर टेप चालू असायचा.  माझा दहावीचा अभ्यास सुद्धा 'पतझड सावन बसंत बहार' आणि 'झुझू झु झु यशोदा का नंदलाला ' असली गाणी ऐकत झाला आहे. त्या मुळे दणदणीत आवाज चालू असला तरी फारसा फरक पडत नाही.

मागेच बसून बोलत असणाऱ्या त्या मुलीने कुणा मैत्रिणीला फोन लावला होता. नॉर्मल शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर संभाषणाची गाडी कुठल्या तरी लग्नावर घसरली. मग लग्नात कुठले ड्रेस घालून कोण आले होते, कसे गेलो, कधी गेलो, कश्शी मज्जा आली आणि त्या नन्तर हळदी ला काय मेनू होता, संगीत मध्ये स्नाक्स   कुठले होते , टिक्की कशी होती, चाट ला चव कशी नव्हती, जलेबी कशी गरम होती, लग्नाच्या दिवशी काय होते, सकाळी काय खाल्ले, दुपारी जेवणात कुठले स्टाल  होते.बाप रे वीस एक मिनिट झाल्यावर मात्र माझा संयम संपला मी एकदम अश्विनीला विचारले 'हिने ओकारी  झाल्याचे सांगितले का ग? " कुठल्याही संदर्भाशिवाय विचारलेला हा प्रश्न माझ्या आजू बाजूच्या सहप्रवाशानाही कळून ते हसले. फोन वरच्या बाई हिंदी मध्ये बोलत होत्या त्यांनाही बहुतेक समजले असावे. तरीही  पाच एक मिनिट बोलून त्या बाई एकदाच्या थांबल्या

काही दिवस मी  अंधेरीच्या एका ग्राहकाच्या कार्यालयात जात होतो. तिथून परत येताना अनेक खाजगी वाहने बोरीवली, कांदिवली, मीरा रोड च्या प्रवाशांना लिफ्ट देतात (अर्थात पैसे घेऊन) .एक दिवस एक गृहस्थ शेजारी बसले. गाडी चालू झाल्या बरोबर त्यांनी मोबायील बाहेर काढला मग आपल्या अनुनासिक स्वरात 'गोरखपूर के चाचा' ची खबरबात, तो फोन संपला की जिजाजी बरोबर पाय लागू, त्या नन्तर एक ग्राहक, मग कुणी तरी मित्र ...पाऊण   तासाच्या प्रवासात त्या माणसाने ५-६ फोन केले. दोन तीन दिवसांनी तेच गृहस्थ पुनः शेजारी आले. (माझे साप्ताहिक राशी भविष्य मी बघायला हवे होते 'कर्ण पिशाच्च त्रासाचा' योग असावा  ) पुनः तोच सगळा प्रकार . या वेळी कुठल्या  तरी कर्जाची चर्चा, सहकार्यांचे गॉसिप,  बहिणीला सल्ला , मित्राशी शिव्या युक्त प्रेमसंवाद . निवांतपणे गेंगाण्या स्वरात , एका मागून एक   कॉल करत,    गाडी मधल्या इतरांना  या सगळ्याशी काहीही घेणे नाहीये याची कुठलीही तमा न बाळगता त्या माणसाचे फोन चालू होते. त्या नन्तर तो माणूस  पुनः नाक्यावर दिसला की मी अदबीने  बाजूला व्हायचो  ,  त्याला एखाद्या गाडीत बसलेला पहिला की मग पुढची गाडी पकडायचो.

पायावर चक्र असला की माणसाच्या नशिबात प्रवास असतो म्हणतात. माझ्या पायावरच्या   चक्रामध्ये  सध्या पंक्चर  चिन्ह उमटले आहे का याची अवस्थेमध्ये आहे याची मला खात्री करून घ्यायची आहे. मध्यंतरी अशाच एका प्रवासात समोर एक वयस्कर जोडपे बसले. अर्ध्या तासात समोरच्या काकांनी आपला मोबाईल  बाहेर काढला आणि मुलाला उठवू लागले. म्हणजे मुलगा घरी डाराडूर झोपला असेल त्याची झोप उडवण्यासाठी सूचना, दुध गरम करून घे, पेपर आला असेल तो आत मध्ये आणू ठेव नाही तर ओळ होईल, आम्ही निघालो तेव्हा पाऊस येईल असे वाटत होते, आता पर्यंत आलाच असेल, पोहे करून ठेवले आहेत उगाच बाहेर जाऊन खाऊ नकोस, नुसता टी व्ही बघत बसला असशील तर आता उठ आणि आंघोळ करून घे . इतक्या  सूचना एखादी  मराठी  मालिकेतली  आई  आपल्या  तरण्याताठ्या  मुलीला  पण  देत  नसेल . वाशी  पासून चालू झालेला  हा  सूचनायज्ञ  लोणावळा  येई  पर्यंत धगधगत होता .  हा  मनुष्य  बहुतेक रेल्वे चा   उद्घोषक  असावा  असे मला वाटू लागले. तुम्ही  ऐका अथवा  ऐकू  नका  तो आपला बोलताच  असतो . आणि त्यांची  पत्नी  मात्र  निवांत  झोप काढत होती . अहो  एवढा बोलका  बोका  राखणीला  असताना  त्यांना  काळजीचे  कारणच  काय  ?

सगळ्यात  वात आणतात  ते  फोन वर धन्द्याच्यी  चर्चा करणारे लोक. बोईसरला जाताना आमच्या  समोर उभे असलेल्या एका काकांनी विरार  पासून  ज्या सूचनांचा आणि चर्चेचा सपाटा  लावला  की त्यांच्या  धंद्याचे गणित , त्यांचा  दांडगा लोकसंपर्क , त्यांचे  सप्लायर्स  , त्यांना काम पुरवणारे लोक अशी  सगळी माहिती  आम्हा  कुटुंबियांना मिळाली .संत  गोरा  कुंभार  जसे  विठुरायाच्या नामस्मरणात  गुंग  होऊन जायचे,  अगदी  मुल  पायाखाली  आले  तरी त्यांचे लक्ष नव्हते  म्हणे. ती तल्लीनता काय  असते याचा अनुभव घेत आम्ही पकत  बसलो होतो  . आणि समोरचे काका वीक  सिग्नल , डब्यातली  गर्दी, माझ्या बुटावर दिलेला एक  पाय अशा  क्षुद्र, लौकिक बाबीकडे  लक्ष न देता अजून अजून मोठ्याने  बोलत  होते.

बस मधून जाताना तर इतके नमुने दिसतात काय वर्णू !  तिथे बसून मित्राशी  F च्या बाराखडीत भांडणार्या तरुणी , नोकरीची चर्चा करणारे  तरुण , 'क्या  नाश्ता  किया ?' अश्या  भंकस  वाक्यानंतारही  अर्धा  अर्धा तास तसेच  वायफळ  बोलणारे लोक . जब  वी मेट चित्रपटातली अखंड वच वच करणारी मुलगी तिथेच बरी वाटते.  हे फुटके नळ आपल्या भोवती वाहू लागले की त्यांचे उपद्रव मूल्य कळते. ओळखीच्या मित्राची बडबड सहन करता येते . पण अनोळखी माणसाच्या बोलण्याचा त्रास होतो खरा  ....पण त्रास करून घेऊ नका ...माझ्या इन्व्हेस्टमेंट आयडिया प्रमाणे काही मोबाईल कंपन्याचे शेअर खरेदी करून ठेवा ...या  बडबडी मुळे आपला लाभांश वाढेल अशी स्वप्ने बघत प्रवास पूर्ण करा .... आणि मग म्हणाल  ...what an idea sirjee!!

२ टिप्पण्या: