नवीन ऑफिस मध्ये आलो आणि पहिल्या पावसानंतर सगळ्यांचे मॉन्सून ट्रेक ला जाण्याचे बेत सुरु झाले . मला मागच्या वर्षीचे संभाषण आठवले .आणि अंगावर काटा आला . हे संभाषण वाचा म्हणजे कळेल
- चलो मॉन्सून ट्रेक पे चलते है (आता मुंबई मध्ये दोन मराठी माणसे हिंदी मधेच बोलतात हे लक्षात येण्या इतके आमचे वाचक सुज्ञ आहेतच )
- अगले हफ्ते चले ?
- नही रे अभी तो जून है इतनी बारीश नही है
- ठीक है जुलै में जाते है
- यार तब तो बहुत बारीश होगी
- अरे पाऊस कमी असेल तेव्हा जाऊ .
-कुठे जायचा ?
-लोहगड ?
- तिथे तर सगळेच जातात
-ठीक आहे मग कोरीगड ?
- नको तो खूप लांब आहे आणि चढायला पण खूप लागेल. जवळचं काही शोधा ना .
-ह्म्म्म …बोइसर च्या पुढे एक रिसोर्ट आहे ….
-नक्को रे… आपल्याला ट्रेक हवाय
- अरे तिथूनच जवळ एक डोंगर पण आहे , तिथे जाऊ ट्रेक ला
--डोंगरावर काय नुसतच जायचा . काही आहे का डोंगरावर?
- आहे की देऊळ आहे .
-- फार चढायचे नाहीये ना ?
--नाही
-- मध्ये पाऊस लागला तर काही आडोसा आहे का?
-- झाडे आहेत … तोच आडोसा
--भूक लागली तर काही दुकाने आहेत का?
आता मात्र सांगणार्याचा सहनशक्तीचा कडेलोट झाला
-- हो आहे की Mcdonald आणि pizza hut चे आउटलेट आहेत डोंगरावर … माझा पुणेरी कुजकटपणा उफाळून आला. ट्रेक मात्र त्या वर्षी राहूनच गेला .
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची तरुणाई भरलेली आहे. उत्साहाने भरलेल्या या तरुणांना काही ना काही उपक्रम सुचत असतात. काही जण समाजसेवा , गिर्यारोहण आणि असे अनेक छंद गंभीर पणे जोपासतात पण या सगळ्यांच्या पाठीमागे अशीही जनता असते ज्यांना काही केले याची मज्जा घ्यायची असते पण फार झीजही लावून घ्यायची नसते .
या सगळ्या आय्ट्यानच्या (आय टी वाल्यांच्या ऐवजी आय टे ) अटी सांभाळून आमचा एक मस्त ट्रेक झाला .
भीमाशंकर हे पावसाळ्यात जाण्यासाठी एक निवांत ठिकाण आहे. पुण्यापासून साधारण १२५ किलोमीटर . आम्ही भीमाशंकर ला जायचे ठरवले पण भोरगिरी हून चालत जायचे आणि भीमाशंकर ला पोहोचायचे असा बेत होता . राजगुरुनगर मधून एक रस्ता चास कमान प्रकल्पाकडे जातो याच रस्त्याने पुढे गेलात कि भोरगिरी हे गाव लागते .
जाण्याआधी आम्ही नेट वर शोधून बरीच माहिती गोळा केली होती. नेट वर एक फोटो ही मिळाला ज्यात ५-७ धबधबे डोंगरावरून वाहताना दिसत होते . सगळ्यांना मेल टाकली त्यात हा फोटो ही टाकला पण मग विचार केला की समजा हे धबधबे नसले तर ? दूरदर्शनच्या मालिकांप्रमाणे टीप देऊन टाकली कि हे दृश्य असेच दिसेल याची काही ग्यारंटी नाही बरं का . उगाच कुणी गळा धरायला नको .
आम्ही निघालो तेव्हा अगदी चास पर्यंत पाऊस नव्हता. पण जसे भोर गिरी जवळ पोहोचलो तसा जबरदस्त पाऊस आला. १५-२० वाट पाहून शेवटी आम्ही बस मधून बाहेर पडलो . समोर पहिले तर तेच फोटो मधले धबधबे स्वागत करत उभे होते. म्हटला चला पैसे वसूल सुरुवात झाली . बसच्या ड्रायव्हर ला सांगितले की तू आता भीमाशंकरला जाऊन आमची वाट बघ .
गावातल्याच एका माणसाला वाट दाखवण्यासाठी बरोबर घेतले आणि निघालो . अनोळखी जंगलात जाऊन वाट चु कण्या इतकी हिम्मत कुणातच नव् हती. काही सहकारी , एक दोघांची कुटुंबे पण बरोबर होती . लहान मुले असल्याने आम्ही पायवाट असलेला सोपा मार्ग निवडला. भीमा नदीच्या काठाने पण रस्ता आहे तो जरा अवघड आहे. सुरुवात केली आणि पाऊस थांबला. थोडे पुढे गेलो तर बरोबरच्या वाटाड्याने झाडावरची भीमाशंकर स्पेशल 'शेकरू ' खार दाखवली अतिशय लाजाळू जनावर . काही क्षणातच गायब झाली तेवढ्यात डोळे भरून पाहून घेतली.
नदीचा प्रवाह सतत सोबतीला होताच . बरेचसे खेकडे , पक्ष्यांची किलबिल , कारवी चे जंगल आणि अधून मधून भुरभुरत येणारा पाऊस एकदम मस्त माहोल . मधेच थांबून फोटोसेशन , कधी बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ असा टाईमपास करत आम्ही चाललो होतो . मधेच एका डबक्यात सलीलला एक छोटा साप दिसला . चालता चालता डोंगरमाथ्यावर ढग कधी खाली आले आणि आम्ही कधी एकदाचे त्या ढगात सामावले गेलो ते कळलेच नाही . एकदम फिल्मी जादुई अनुभव .
जशी नदीच्या पात्रात घाण आणि प्लास्टिक दिसू लागले तेव्हा लक्षात आले कि आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. साडे अकरा ते चार वाजेपर्यंत आम्ही चालत होतो पण अजिबात थकवा जाणवला नाही . मंदिर रम्य ठिकाणी आहे आणि आपल्या लोकांनी नेहेमीप्रमाणेच त्या सुंदर ठिकाणी अस्वच्छता करून ठेवली आहे. आपले मन या सगळ्याला आता सरावले आहे. असो .
काही गोष्टी या ट्रेक मधून समजल्या
- जंगलात जाणार असाल तर माहितगार माणूस बरोबर हवाच . नेट वरचे सगळेच बरोबर असते असे नाही .
- पिण्याचे पाणी हवेच . शायनिंग मारण्यासाठी बिना पाण्याचे गेलात तर बिनपाण्याने होईल .
- तहानलाडू भूकलाडू सोबत हवेतच . भीमाशंकरला अपेक्षेप्रमाणेच एकदम दिव्य हॉटेल्स होती
- मोसम कसा असेल त्याचा अंदाज कुणी करू शकत नाही . एन्जॉय करायला शिका.
- ट्रेक मध्ये नवे स्पोर्ट्स शूज खराब होतील असे वाटत असेल तर सोसायटीच्या jogging track वरच फिरा . बाहेर जायची तुमची लायकी नाही .
- अमुक प्राणी किंवा पक्षी दिसेलच याची कुठलीच खात्री नसते. जे दिसेल ते उघड्या डोळ्यांनी पाहायचे,टिपून ठेवायचे , ज्याला माहिती आहे त्याच्या कडून ऐकायचे हाच जंगलातून फिरण्याचा खरा आनंद .
प्रवासासाठी आम्ही मिनी बस केली होती. सगळा मिळून माणशी खर्च आला ३७५ रुपये . त्यामुळे पुणेकरांचा आनंद द्विगुणीत झाला.
आमच्या ट्रेक च्या कहाण्या ऐकून ऑफिस मधले बरेचसे ग्रुप्स गेले . आणि सर्वांनाच मजा आली . (हे आपले दिले ठोकून कारण कुणी तक् रार करत आला नाही )
आमचा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला तसा तुमचाही होवो.
ता क - या ठिकाणचे कारवीचे जंगल पाहून आठवले. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी २०१४ च्या एप्रिल , मे मध्ये फुलणार आहे . तो नजारा कसा चुकवावा बरे ?
Paisa wasool drushya......u will just love it |
pawsalyatale ase nale aani ohol bhima nadila jaun miltaat |
kasalaq fulora hota mahit nahi pan khupach najuk fule hoti |
rastyatun jatana ashi drushye aapan swargat aahot ki kay asa prashna padat hoti |
dhag bharun aale aani ek apratim drushya sakarale |
ha ek cactus ..pahilyandach pahila.. |
dhagaat gelo aamhi |
ghatparni wanaspati....pustkat pahili hoti shalet astana |
kaaraviche jungle..... |
mandira baher wikrisathi asnari raan-haldichi fule. |