गुरुवार, २५ जुलै, २०१३

दमलेल्या मुलाच्या बापाची एक विनंती !!

प्रिय मुख्याध्यापक ,

प्राचार्य असे मुद्दाम लिहिले नाही कारण मला माध्यमिक शाळेच्या प्रमुखांना उद्देशूनच लिहायचे आहे . रोज माझ्या मुलाला शाळेच्या बसपाशी   सोडणे हि माझी जबाबदारी . आज त्याचे दप्तर नेहेमिपेक्षाही प्रचंड जड वाटले . तसेही ते रोजंच जड असते . पण आज जरा जास्तीच जड होते. शाळे मध्ये रोज नऊ तासिका असल्याने त्याने प्रत्येक तासिकेची वही आणि पुस्तक शिवाय शाळेची डायरी अशी सुमारे एकोणीस पुस्तके दप्तरात कोंबली होती . शिवाय २ डबे , पाण्याची बाटली वेगळेच.

सगळे मिळून साधारण आठ ते साडे आठ किलो वजन होते ते. माझ्या मुलाचे वजन साधारण २४ किलोच्या आसपास आहे . पाचवीतला लहानखुरा मुलगा आहे तो . ते दप्तर त्याला उचलून घेता येत नव्हते आणि खांद्यावर घेतले तर तो वाकला होता . परवा त्याच्या डायरी मध्ये त्याने चित्र काढले होते, एका वाकलेल्या मुलाचे आणि शीर्षक होते " बहुतेक मी शाळेतच म्हातारा होणार ". आज त्याला माझ्या समोरच वाकलेला पाहून त्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे जाणवले .

मी शाळेत असल्यापासून शिक्षण तज्ज्ञ दप्तराचे वजन  कमी कसे करता येईल या करताना वाचतो आहे. पण आजही हे वजन कमी झालेच नाहीये . गेल्या वीस वर्षात शिक्षण तज्ज्ञांच्या दोन पिढ्यांनी या परिषदा आणि परिसंवाद सजवण्या  पलीकडे काय केले असा मला आज प्रश्न पडला आणि म्हणून हे पत्र .

आपल्या मुलांचा आणि मुलांचे प्रश्न शाळेने आणि त्यांच्या शिक्षकांनी सोडवावेत असे वाटणारा एक पालकांचा वर्ग आहे. मी त्यातला नाही असे मला वाटते म्हणून आपण या वर काय करू शकतो याचा विचार मी करू लागलो .

सरकारी धोरण नाही किंवा शिक्षण मंडळाने अमुक करू नका म्हणून सांगितले आहे असे उत्तर मला मिळेल याची मानसिक तयारी मी केली आहे. मी एक सामान्य पालक आहे आणि शालेय धोरण किंवा सरकारी खात्याच्या धोरणाची माहिती मला नसणार हे तुम्हाला माहित आहे. आणि याचाच फायदा घेऊन तुम्ही अशी उत्तरे देऊ शकता याची मला कल्पना आहे.

तरीही आगाऊ पणाचा दोष पत्करून मी हे मुद्दे लिहितो आहे.

  1. एका बाकावर बसणारी दोन मुले असतील तर त्यांनी पाठ्यपुस्तके वाटून घ्यावीत म्हणजे प्रत्येकाच्या दप्तरातील निदान निम्मी पुस्तके तरी कमी होतील .
  2. वर्गातील अभ्यासाच्या वह्या शाळेत ठेवण्यासाठी कपाटे हवीत . दर तासिकेत  वेळ जात असेल तर सकाळी शाळेत आल्यावर मुले आपआपला गठ्ठा घेतील आणि शाळा संपल्यावर ठेवून देतील .
  3. गृहपाठाच्या वह्या घरून आणाव्या लागतात त्या शंभर पानीच असतील .
  4. शाळेत शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल याची खात्री असेल तर पाण्याच्या बाटलीचे वजन सुद्धा कमी करता येइल.
यातल्या उपायाला फार काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही . हे उपाय न करण्या साठी तुम्हाला शंभर एक सबबी मिळतील. खरं सांगायचा तर याच लंगड्या सबबी वापरून आपण हा प्रश्न असाच, मुलांच्या कोवळ्या खांद्यावर, लटकावून ठेवला आहे .

हे सगळे टाईमपास म्हणून लिहितो आहे असे वाटत असेल तर एक काम करा …स्वत:चे वजन करा . अंदाजे ६०-६५ किलो भरेल . जास्ती असले तर अजूनच उत्तम . आणि एक तृतीयांश वजनाची , म्हणजे २० किलो किंवा त्या पेक्षा जास्तीची गव्हाने / रद्दी कागदाने भरलेली पिशवी घेऊन उभे रहा. साधारण पाच मिनिटात माझ्या मुलाने डायरी मध्ये ते चित्र का काढले होते ते तुम्हाला कळेल आणि वर सांगितलेले चार उपाय कसे राबवता येतील याची अजून दोन चार कारणे समजतील .

बघा …ताठ कणा असणारी विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी मुल्य शिक्षणाच्या तासा बरोबरच थोड्या कृतीशीलतेचीही हि गरज आहे हो .

आपला ,

दमलेल्या मुलाचा एक बाप

३ टिप्पण्या: