शनिवार, ३० एप्रिल, २०११

आम्हाला "आधार" मिळणार

 आम्हाला "आधार" मिळणार
तमाम जनतेला अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी नंबर सारखा Unique Identiity Number मिळणार, नंदन  निलेकणी या प्रोजेक्ट चे प्रमुख, पंतप्रधानांनी 'आधार' चा शुभारंभ केला इत्यादी इत्यादी बातम्या वाचल्या होत्या मधेच कुणीतरी घरी येऊन बरीचशी माहिती पण गोळा करून गेले , त्या नंतर जन गणनेची माहिती पण घेतली गेली आणि हा युनिक  आय डी विस्मृतीमध्ये पण गेला.
मागच्या  आठवड्यात अश्विनीच्या मैत्रिणीने सांगितले की आमच्या विभागात  कुठेतरी हे युनिक आय डी कार्ड देण्याची सोय झाली आहे. सकाळी फिरायला जाताना महापालिकेच्या वार्ड ऑफिस बाहेर "आधार" कार्ड चा बोर्ड दिसला म्हणून चौकशी केली तर तिथेच कार्ड मिळण्याची सोय सरकारने केल्याचे कळले. रोज सकाळी नऊ वाजल्या पासून संध्याकाळ पर्यंत यांचे काम चालते. एक फोटो आय डी चा पुरावा ज्यात पासपोर्ट , PAN कार्ड, मतदार पत्र,  नोकरीचे ओळखपत्र  अगदी लहान मुलांच्या शाळेचे ओळखपत्र सुद्धा चालते. आणि एक राहत्या पत्त्याचा पुरावा (विजेचे बिल , फोन बिल , बँकेचे पासबुक किंवा स्तेतमेंत , रेशन कार्ड ) सोबत घेऊन जा. आम्ही या सगळ्याच्या झेरोक्स प्रती घेऊन शनिवारी सक्काळी गेलो तर कळले फक्त १०० अर्ज दिले जातील. दुपारच्या सेशन मध्ये अजून काही अर्ज देऊ.  अश्विनी आणि सलील चा पारपत्र (म्हणजे passport हो )  मिळवताना आम्हाला घराचे पत्ते बदलल्यामुळे  फारच वैताग झाला होता म्हणून आम्ही सध्या बुड स्थिर आहे तोच आधार कार्ड ताब्यात घेण्याचे ठरवले.
दुपारी एक वाजताच अश्विनी तिथे रांगेत जाऊन उभी राहिली. अडीच वाजता केवळ २० अर्ज दिले जातील म्हणून सांगितले गेले. नशीब आम्ही रांगेत बर्या पैकी पुढे होतो. शंभर दीडशे लोकांच्या गर्दी मध्ये केवळ ३-४ मराठी कुटुंबे होती. हे पाहून आमच्या मागचे काका तावातावाने आपल्या मराठी लोकांना या पुराव्यांचे महत्त्व कसे वाटत नाही आणि हे परप्रांतीय सगळे पुरावे गोळा करून कसे आपल्यावर कुरघोडी करतात त्याच्या कहाण्या सांगत होते. मलाही आश्चर्य वाटले तिथे असणाऱ्या सगळ्या हिंदी भाषिकांकडे मतदार ओळख पत्र, रेशन कार्ड , PAN कार्ड आवर्जून होते. मी मराठी असून माझ्याकडे मुंबईच्या पत्त्याचे रेशन कार्ड नाही, माझ्या पत्नीचे मतदार ओळख पत्र नाही , माझ्या मुलाचे कुठल्याच रेशन कार्ड वर नाव नाही....आपल्या अनास्थे बद्दल आम्हाला खरोखर खंत वाटली... बाहेरून येणारे लोक हे सर्व पुरावे गोळा करतात...आणि आपली व्यवस्था फक्त पुराव्यावरच विश्वास ठेवते...उद्या अधिवास  (domicile)  प्रमाणपत्र देताना एखाद्या परप्रांतीयाला ते मिळू शकते पण मला नाकारले जाऊ शकते ...
आज महाराष्ट्र दिनी आपल्याला या राज्यासाठी काय करता येईल तर निदान  मराठी लोक इथे राहतात याचे पुरावे तरी गोळा करून ठेवता येतील..नाही राज्याच्या तर आपल्या  तरी ते उपयोगी पडतील म्हणून हा लिहिण्याचा  खटाटोप...तुम्ह्च्या जवळच्या वार्ड ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा आणि दोन पुरावे घेऊन आधार साठी नोंदणी करा.
दोन अडीच तास 'तप' केल्यावर एकदाचा आमचा नंबर आला आणि आमचे हाताचे ठसे , बुबुळ , अर्ज आणि पुरावे स्क्यान झाल्यावर पावती मिळाली....हुश्श करून बाहेर पडलो... कालच्या या प्रसंगाचा विचार कताना मला पंकज कपूर ची एक जुनी "फटीचर " नावाची मालिका आठवली...त्या फटीचर  ला एक जण सांगतो...की तुझ्या कडे  रेशन कार्ड नसेल तर तू अस्तित्वातच नाहीस...तुझे जिवंत असणे हे सरकारच्या लेखी फक्त रेशन कार्डवर अवलंबून आहे...ह्म्म्म... निदान आमच्या अस्तित्वाला आता  "आधार" चा आधार आहे