बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मेणबत्त्यां​चा उजेड

लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल  IAC   आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का?  माझ्या 'नाही'  या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.

gtalk वर अण्णांना पाठींबा देणारी caption टाकणे, टोप्या आणि बनियन घालणे  आणि मेणबत्ती मोर्चाला  जाणे एवढी सोपी ही लढाई आहे असे मला खरेच वाटत नाही. मला सांगा लोकपाल बसवून माझे कुठले प्रश्न सुटणार आहेत ? प्रत्येक सरकारी कार्यालयात  दुनियाभरची कागदपत्रे जमा करावी लागतात . ती कमी होणार आहेत ? म्हाडाच्या लॉटरी मध्ये जे झोल होणार ते थांबणार आहेत? रस्त्याच्या कडेने उभ्या ट्रक ना जी चिरीमिरी द्यावी लागते ती थांबणार आहे ? थोडक्यात सांगायचे तर रोजच्या जीवनात जो भ्रष्टाचार दिसतो आहे तो कमी करायचा असेल तर आपल्या कृतीची गरज आहे. त्यासाठी अण्णांचे उपोषण सुरु होण्याची कधीच गरज नव्हती.

सरकारी कार्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. इतक्या मोठ्या देशात जर सुसूत्रता  ठेवायची असेल तर कुणा व्यक्तीच्या लहरीवर कारभार ठेवणे चालणार नाही म्हणजे व्यक्ती निरपेक्ष नियम हवे. अनेक प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी विविध नियम उपनियम निर्माण करणे भाग आहे. मुळात इंग्रजांचे  हे नियम असल्याने भारतीयांवारचा अविश्वास हाच या नियमांचा पाया  होता . त्या मुळे प्रत्येक ठिकाणी ढीगभर कागदपत्रे पुरावा म्हणून मागणे हा सरकारी अधिकार्यांचा हक्क बनला आहे. या सगळ्या यम नियमांच्या  जन्जालातून  सुटका हवी म्हणून आपण सरळ साम, दाम  वापरतो. आणि वर परत भ्रष्टाचाराची ओरड करतो.

अनिलकुमार लखिना म्हणून एक जिल्हाधिकारी होते. बहुतेक नगर जिल्ह्यात त्यांनी हा प्रयोग केला. सरकारी कार्यालयाबाहेर  फळ्यावर माहिती देणे अशी सोप्पी वाटणारी गोष्ट त्यांनी चालू केली. कार्यालयात कामाच्या फ्लो प्रमाणे रचना करणे असे उपाय करून त्यांनी कामाचा निपटारा कसा होईल याचा विचार केला...सरकारने काय केले? त्यांचे कौतुक केले , लखिना pattern आम्ही राबवणार म्हणून डांगोरा  पिटला. आणि इतर अनेक योजना प्रमाणे   ही पण योजना कागदावर साजरी केली गेली.

लोकांना सहज माहिती देणे, त्यांच्या अर्जाची काय अवस्था आहे ? कुणाच्या टेबल वर फाईल आहे ? तिचा निर्णय होण्यात काही अडचण आहे का? अशा सध्या सोप्या प्रश्नांची माहिती देण्या इतकी  पारदर्शकता जरी आपण आणू शकलो तरी भ्रष्टाचाराला बराच आळा बसू शकेल. खर्चाचा ताळेबंद , ऑडीट रिपोर्ट , स्थायी समितीचे निर्णय अशा गोष्टी आपण लोकांसमोर ठेवण्याची प्रथा चालू केली तरी कुणाला भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करताना लाज वाटेल, पहिल्या महिन्यात वाट लागलेल्या फ्लाय ओवर चे दुरुस्ती पुनः त्याच बिल्डर कडे देताना दोन वेळा विचार करावा लागेल.

खरी गरज आहे नियम सोपे करण्याची , त्याची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणण्याची, प्रशासनात पारदर्शकता आणण्याची. कोरडी आश्वासने देण्यापेक्षा काही कृतिशीलता दाखवण्याची. ही सगळी कामे सरकारनेच कार्याची का? लोकांनी फक्त मोर्चे काढले म्हणजे झाले का? मेणबत्त्या जाळल्या की पडला उजेड?  जनतेची काय जबाबदारी आहे ?

आपला समाज  पण विरोधाभासांनी भरलेला आहे. श्रावण पाळणारा भाविक माणूस आपला गुत्ता श्रावणात बंद करत नाही. वेगवेगळ्या मंदिरात लाखो रुपयांचा चढावा चढवणारे लोक तो पैसा जमा करताना किती  विधी निषेध बाळगतात ? आंदोलनाच्या बाजूने मी फार बोलत नाहीये म्हणून माझ्यावर नाराज असलेला माझा मित्र नंतर पासपोर्ट काढण्यासाठी एजंटला भेटायला गेला. आता त्या एजंट ला देणार असलेले पैसे हा भ्रष्टाचाराला हातभार नाही का? मला अश्विनी आणि सलील च्या पासपोर्ट साठी चार वेळा वरळीला जावे लागले. पण असा वेळ 'वाया' घालवण्या पेक्षा एजंट सोप्पा नाही का? शिवाय एजंट ला पैसे दिले की आपण भ्रष्टाचाराला हातभार न लावल्याचे समाधान मिळते ते वेगळेच . अरे काय हा ढोंगीपणा ! वागण्या बोलण्यातली एकवाक्यता , integrity ,आपण हरवून बसलो आहोत. हेच कारण आहे हा " भ्रष्ट आचार " समाजात मुरण्याचे. कलमाडी , राजा, कानिमोली यांना लोकपाल बघून घेतील. पण चिरीमिर देताना आपणच आपले लोकपाल व्हायचे आहे.  सद-असद विवेक बुद्धीला थोडे जागे ठेवायचे आहे.
 
हे सगळे मोर्चे निघत आहेत मुख्यतः सुशिक्षित वस्त्यांमधून . या वस्त्यांमधून मतदानाचे प्रमाण किती ? आख्या मुंबईतले प्रमाण ३५-४० टक्के  इतकेच आहे. आणि मला खात्री आहे की यात मुख्य भाग झोपडपट्ट्या मधून  राहणाऱ्या श्रमजीवी लोकांचाच आहे. स्वतः मतदानाच्या दिवशी औटींगला जाणार्या लोकांनी पुढच्या वेळी निदान मतदान केले तरी या मेणबत्त्या कामी लागल्या असे म्हणता येईल. 

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

शेंग फुई आणि मी

हाय,

बऱ्याच दिवसांनी मोठ्ठी सुट्टी आली म्हणून आम्ही जवळपास फिरायला म्हणून केत्काव्ल्याच्या बालाजी मंदिरात गेलो होतो. तसा माझा आणि या देवदेवस्कीचा  फारसा संबंध नाही ..पण काही चांगले फोटो मिळतील आणि पावसातले मावळ पाहायचे म्हणून  मी पण गेलो होतो. जाताजाता रस्त्यातले जाहिरातींचे फलक पाहून हसू आले...जाहिराती कसल्या ...गिर्हाईके  पकडण्याचे  गळच ते .....दोन  मोठे बोर्ड ..त्यावर राजीव गांधी वास्तु शिरोमणी पदक विजेत्या बोक्याचे छायाचित्र ...आणि प्रगतीची ग्यारंटी सुद्धा ...धार्मिक स्थळी जाणार्या भाविकांना गटावण्याचा एक नवा मार्ग.

बऱ्याच वर्षांपूर्वी आमचे साहेब एक दिवस अचानक टेबल ची दिशा बदलून दरवाज्यात बसलेले दिसले. शिपायाला विचारले की हे असे दरवाज्यात ठाण मांडून का बसले आहेत ? " अहो ते काल शेंग फुई वाले आले होते ना . त्यांनीच सांगितले जागा बदलायला " तो म्हणाला ..हम्म आदल्याच दिवशी एक दाढीवाले गृहस्थ येऊन गेल्याचे आम्हाला आठवले. तेच बहुतेक फेंग शुई तज्ञ असावेत. अशी ही शेंग फुई , आपल्या भारतीय जीवनात वास्तु, फेंग शुई, पिरामिड , पायारावास्तु   अशा अनेक नावानी धुमाकूळ घालू लागली आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली या न्यायाने अनेक जण प्रयोग म्हणून पण यात सांगितलेले तोडगे करून बघतात.

इंदोर मध्ये मी शाखा व्यवस्थापक असताना या वास्तु प्रकाराने मला जाम पिडले होते. त्या शाखेत भरपूर बुडीत कर्जे. वसुलीचा एकमेव मार्ग म्हणजे गहाण ठेवलेली जागा, घर, दुकान विकणे आणि मिळतील तेवढे पैसे बँकेच्या कनवटीला लावणे. अशी एखादी मिळकत विकायला निघाले की जे खरेदीदार येत ते सोबत आपल्या आपल्या वास्तु तज्ञाला पण घेऊन येत. मग तो प्रत्येक वस्तूची मापे काढीत असे. दाखवायला आलेल्या मुलीला पण पूर्वी कुणी इतक्या बारकाईने  न्याहाळले  नसेल. एवढे करून प्रत्येकाचे मत वेगळेच.

एकदा एका खातेदाराला मी विचारले ,'अरे तुझा नवा बंगला होऊन फक्त ३ वर्षे झाली तोच तुझ्या धंद्याचा बट्ट्याबोळ झाला. तू काही वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतलास की नाही ? "
"काय सांगता साहेब. मी तर घराचे प्लान्निंग करतानाचं  दुबईहून आलेल्या वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतला होता. " तो ताबडतोब उत्तरला .
"अरे वा , म्हणजे अरब लोकांमध्ये पण हे असले प्रकार असतात की काय?" मी माझ्या पुणेरी कुचकट टोन मध्ये विचारले.
"नाही. हा माणूस भारतीयच आहे पण तो फक्त गल्फ मधल्या भारतीयांना मार्गदर्शन करतो" असे सांगून त्याने मला जवळपास १० मुद्दे असे सागितले ज्या आधारावर त्याची वास्तु एकदम परफेक्ट ठरत होती.

दोन चार दिवसात आमचाच एक ग्राहक तो बंगला बघण्यासाठी आला. तो स्वतःच स्वयंघोषित वास्तु तज्ज्ञ होता. त्याला पण मी या घराबद्दलचे मत विचारले. आता त्याची मुक्ताफळे ऐका
"साहेब, या घरात दोषच दोष आहेत की. अहो बैठकीची जागा जेवणाच्या जागेपेक्षा खालच्या लेव्हल ला म्हणजे धंद्यात नुकसान. घराला किती दरवाजे आहेत ...अहो या घरात वारा राहू शकत नाही तर लक्ष्मी कुठून राहणार ? आता तुम्ही म्हणता आग्नेय दिशेला स्वयंपाक घर आहे पण त्याच्याच बाजूला धुणे भांडे करण्याची जागा आहे त्या साठी पाणी लागते ...म्हणजे आला की नाही दोष ?  पाण्याची टाकी उत्तरेला आहे पण ती exactly दरवाज्याच्या बाहेर जमिनीखाली आहे ..माणूस घरातून बाहेर पडला की डायरेक्ट  खड्ड्यात  आणि सर्वात  महत्वाचे ....मास्टर बेडरूम पहा . मालकाच्या झोपण्याच्या जागेखाली काय आहे ? " मला काही कळेना हा नक्की काय म्हणतो आहे . मला बावचळलेला पाहून तो म्हणाला " खालच्या हॉल मधील  सर्वासाठी असणारे शौचालय आहे . बरोबर शौचालयाच्या वर हा माणूस झोपणार  ...याच्या डोक्यात विचार तरी कुठून चांगले येणार ? " त्याच्या या वाक्यासरशी मला  खालच्या संडासातून वाफे प्रमाणे वर येणारे वाईट  विचार वर झोपणार्या मालकाच्या डोक्यात जात आहेत असे दृश्य दिसू लागले.

या मिडियावाल्यांना  पण काहीही विकले जाणारे द्यायचे असते... इथे एका वर्तमानपत्रातल्या गृह विषयक पुरवणी मध्ये एक गृहस्थ वास्तु वर लिहायचे  ओटा, उंबरा, दारे, खिडक्या , कपाटे असे फुटकळ विषय झाल्यावर त्यांनी Toilet चा प्रश्न हाती घेतला. एक आठवडा , दोन, तीन ...पाच आठवडे झाले तरी याच्या सूचना काही संपेनात. आणि स्वारी प्रसाधनगृहातून  काही बाहेर येईना. दर आठवड्यात त्या सूचनांचा भडीमार वाचणे हा आमचा एक विनोदाचा विषय झाला होता. एखाद्याने जर या सर्व सूचनांचे पालन करून संडास बांधला असता तर लक्षात आले की टोयलेट    सीट  पासून ५ फुटावर नळ आहे आणि बागुवा पत्रिकेप्रमाणे  बसताना सीटच्या उलट्या  दिशेत बसावे लागणार आहे. पुढच्या लेखात या माणसाने तुमच्या प्रसाधनगृहात शेजार्यांना जाऊ दुया आणि तुम्ही त्यांच्याकडे जा असे सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते.

या वास्तु प्रकरणा मध्ये फायदा भरपूर असावा. डॉक्टर पदवी लावणारे हे लोक कशाचे डॉक्टर आहेत ते मात्र लिहित नाहीत. यांचे जाहिरातयुद्ध पण वाचनीय असते....
" पुरातन ग्रंथाशिवाय  आम्ही काहीही शिकवत नाही"
"आम्ही मात्र जुन्या ग्रंथांचा नव्याने अर्थ लावून शिकवतो "
"आमच्या तेराशे स्लायीड वाचून शिका"
"उगाच भराभर नोटसचा   कचरा नाही , डोळसपणे शिका "
"तीन दिवसात पिरामिड चे शास्त्र  शिका "
"पिरामिड सारखी २- ३ दिवसांची  थोतांडे आमच्या कडे नाहीत. अस्सल संस्कृत ग्रंथ आणि फेंगशुई चा मिलाप "
"फेंग शुई फक्त चीन मध्ये भारतात तिचा काहीच उपयोग नाही. "

बर्याचे वेळा माणसाला काही मार्ग दिसत नसला की तो या सगळ्या गोष्टींचा सारा घेतो. पण कशाच्या आणि किती  आहारी जायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे . तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी सगळे तयार आहेत. बस तुमच्या खिशातील नोटांची सळसळ त्यांना ऐकू जाण्याचा अवकाश आहे.