सोमवार, २५ जुलै, २०११

घरोघरी औरन्गजेब जन्मती

चहा पिताना एका सहकार्याशी बोलणे चालले होते...तिची तक्रार होती की आमच्या घरात कुणालाच कशातच रस नाही . कसला छंद नाही, कुणी काही वेगळे करत असले तर किंमत नाही.  सृजनाचे  , नाविन्याचे , रसिकतेचे एवढे वावडे का हो असते लोकांना ? अनेक घरांमध्ये असे चित्र असते. पोराने कागदाची काही वस्तू बनवली की आपण 'घरात किती कचरा केलास' म्हणून डाफरतो. चांगले चित्र काढत असला की ते रंगाचे पाणी सांडू नको म्हणून ओरडतो. मस्त पैकी खेळून आलेला  मुलगा आज कशी मज्जा आली म्हणून सांगू लागला की आपण चला आता अभ्यासाला लागा म्हणून त्याला गप्पा करतो. जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर लिहिले असले की शिक्षक चूक म्हणून लिहितात. लहानपणा पासून आपण हे असले घरो घरी दिसणारे औरंगजेब पाहताच असतो. बाबांसारखे मोठे बनलो की मग आपल्याला अडवणारे कुणीही नसेल म्हणून स्वप्ना बघत असतो. मग आपल्या डोक्यात येईल तसे करू म्हणून मांडे खात असतो. माझे तरी असेच झाले. वाणिज्य शंकेचे शिक्षण घेताना 'व्यवस्थापन' , पीटर ड्रकर, मास्लो इत्यादी फंडे ऐकत असताना वाटत होते की वा नवे काही करणाऱ्या मानसाले बरेच काही करता येईल की नोकरी मध्ये.

आपले व्यवस्थापन तज्ञ creativity चे कितीही गोडवे गात असले तरी कार्यालयांमध्ये दृश्य वेगळेच दिसते. नव्याने नोकरीला लागलो होतो तेव्हाचा एक किस्सा सांगतो. आजारपणाच्या सुट्टी वर घरी असताना ,  बँकेला आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याची एक योजना सुचली. नवीन होतो . सरळ कागदावर लिहिली आणि बँकेच्या चेअरमन आणि जनरल म्यानेजरना  पाठवून दिली. काही दिवसांनी आमच्या व्यवस्थापकांनी मला केबिन मध्ये बोलावून तुसडे भाव तोंडावर ठेवून एक पत्र दिले. पत्र वाचले तर कळले की चेअरमन ना ती योजना आवडली होती आणि तिचा अजून अभ्यास करण्यासाठी त्यांनी काही विभाग प्रमुखांकडे पाठवली. मी परस्पर असला उद्योग केल्यामुळे साहेबाना क्रेडीट मिळाले नाही म्हणून तो तुच्छतेचा भाव चेहऱ्यावर होता. त्यांचे कारण मी समजू शकलो. पण दुपारी जेवता एक सहकारी कुजकट पणे म्हणाला ' आता अजून एकदा अशीच मोठी सुट्टी घे म्हणजे अजून कल्पना सुचतील.' पुणेरी तिखट पणा अंगात असल्याने ताडकन म्हणालो. 'अहो कल्पना सुचायच्या असल्या की बसची वाट पाहताना ही सुचतात, नळावर पाणी भरताना पण सुचतात त्याला सुट्टी कशाला घ्यायला पाहिजे ? '

बहुसंख्य लोकांना नाविन्याचे वावडे असते. कुणी काही नवे मांडले की त्याला फाटे फोडणे , ते कसे प्रचलित प्रथांच्या विरोधात आहे हे मांडणे , ते इतरांना कसे चालणार नाही हे सिद्ध करण्यातच लोकांना जास्ती उत्साह असतो. आणि हे फक्त कार्यालयीन बाबतीतच नाहीये वैयक्तिक छंद , करीयरची निवड अश्या बाबतीतही दिसते. कुणी म्हणून तर बघा .'मी आता ट्रक चालवायला शिकणार आहे' किंवा ' रविवारी मी बागकामाच्याच्या छंदवर्गासाठी प्रवेश घेणार आहे .' लोक असे विचित्र नजरेने बघतील की बस. आणि स्वतःला तुमच्या जवळचे समजत असतील तर तुमचा निर्णय बदलायला पाहतील.

एकदा मुख्य कार्यालयाला काही पत्र पाठवायचे होते. आकडेवारी आणि पत्र लिहिणे असली दुष्काळी कामे साधारणतः नवख्या लोकांनाच करायला लागतात त्या मुळे बॉसने पत्र लिहिण्यास मला सांगितले. नव्याचा उत्साह होता...मस्त पत्र लिहिले, आकडेवारीच्या चौकटीला जरा रंगकाम करून सजवले. कसले काय...साहेबांनी पत्र बघून तारे तोडले, 'अरे असले उद्योग करायचे नसतात. हेड ऑफिसवाले लोक म्हणतील यांच्याकडे काम नाहीये.' गुमानपणे एक रटाळ पत्र लिहिले आणि तितक्याच नीरसपणे ती आकडेवारी लिहिली.
आमच्या संस्थेच्या गृहापत्रीकेमध्ये कुण्या एकाने टायपिंग मशीन वापरून गांधीजींचे चित्र बनवले होते. 'हेड ऑफिस मध्ये भरपूर वेळ असतो असली कामे करायला ' लगेचच निष्कर्ष बाहेर.

G-talk वर कॅप्शन टाकायला असं कितीसा वेळ लागतो. माझ्या एका जुन्या सहकार्याचे आवडते वाक्य होते ' कसा काय वेळ मिळतो या लोकांना कॅप्शन टाकायला काही कळत नाही' . 'वेळ ' एक मस्त सबब ......जणू काही छंद जोपासणारा माणूस कामधाम सोडून आपले छंदच कुरवाळत बसतो. खेळाडू, कलाकार लेखक असे अनेक छंद असणारे लोक उपजीविकेसाठी काही नोकरीधंदा करत असतात. पण म्हणून काही सगळ्यांना कामातून सूट मिळते असे नाही. आपले काम सांभाळून हे लोक आपले छंद पुरवतात.  'त्यांच्या खात्यामध्ये काही काम नाहीये म्हणून लिहायला जमते हो ' हे वाक्य ऐकल्यावर मी बरीच वर्ष लिहिले नाही. मग विचार केला असल्या औरंगजेब टायीप लोकांसाठी मी माझा आनंद का घालवावा? आताही नोकरी करतोच आहे त्या मुळे इथेही औरंगजेब असणार याची खात्री आहे. म्हणून हा टोपणनावाने लिहिण्याचा उद्योग.

 या सगळ्या लोकांचा नक्की राग कशावर  असतो ते  मला अजून  समजलेले नाही . आपल्याला जे जमले नाही ते यांना जमते याचा राग असतो. सूक्ष्म असूया हे एक कारण असू शकते. काही वेळा नव्या मार्गाने जाऊन धोके पत्करण्याची  तयारी नसते. वाढत्या वयामुळे 'रिस्क' घेण्याची तयारी नसते. हुकुमशाह लोकांना तर नवनिर्माण करणाऱ्या लोकांची भीतीच असते ("नवनिर्माण" ची भीती तेव्हापासूनच आहे राज्यकर्त्यांना ). आपल्या सुपीक डोक्यातून निघणार्या कल्पनांनी हे लोक जनतेला बहाकावून टाकतील म्हणून कलाकर, कवी ,  तत्त्वज्ञ लेखक हे लोक कायमच सत्ताधार्यांची डोकेदुखी बनलेले आहेत. माझे स्थान अबाधित राहिले पाहिजे, कुणी आव्हान देणारे जवळपास असू नये , माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाची लोकप्रियता वाढली तर मला धोका निर्माण होईल अशी  असुरक्षिततेची भावना असणारे लोक आपल्या स्थानाचा फायदा घेऊन सृजनशीलता चिरडून टाकण्यात अग्रेसर असतात.

जे मोठ्या राजसत्ते बाबत होते तेच छोट्या ऑफिस मधल्या छोट्याश्या सत्तास्थाना मधेही होते.  आपल्या अधिकारांचा वापर करून , धाक दाखवून, दुर्लक्ष करून ठीकठिकाणचे औरंगजेब स्वतःला सुरक्षित करू पाहतात. सृजन मात्र थांबत नाही...कोंब फुटल्याशिवाय राहत नाहीत...

1 टिप्पणी:

  1. फार छान. मी नोकरीत (वरिष्ठ पदावर असताना) ऑफिसचे कांही लोक एक समस्या घेऊन घरी आले. आम्ही चर्चेत असं जमणार नाही, ते होणार नाही इ बोलत होतो व समस्येबद्दल काळजीतही होतो. ते गेल्यावर माझा धाकटा मुलगा -- वय वर्षे दहा मला म्हणाला -हे असं असं होऊ शकेल. मी म्हटलं अरे सरकारमधे असं होत नाही, करता येत नाही. तो म्हणाला पण तू तर मोठी अधिकारी आहेस, बदल ना ते नियम आणि सोडव समस्या. "का नाही" हा प्रश्न तूच आम्हाला शिकवतेस मग आता कां नाही ?
    त्यानंतर नोकरीभर खूप बंडखोरी केली आणि प्रत्येक वेळा तो दिवस कायम आठवतो.

    उत्तर द्याहटवा