मंगळवार, २८ जून, २०११

आजचे वर्तमानपत्र

आजच्या वृत्तपत्राने मस्त प्रश्न उभे केले. विसंगती मधून विनोद निर्माण होतो असे विनोदाबाबत लिहिणारे गंभीर लोक म्हणतात...आजचा पेपर विनोदी होता हेच खरे...

येडीयुराप्पानी , कर्नाटकाच्या मुख्य मंत्र्यांनी आपल्यावरचे आरोप खोटे आहेत म्हणून देवाची शप्पथ घ्यावी असे आव्हान कुमारस्वामी (आपल्या झोपाळू देवेगौडांचे चिरंजीव) यांनी केले. मी केलेलं आरोप खरे आहेत म्हणून कुमारस्वामिनी शप्पथ ही घेतली. मला धोब्याच्या भूमिकेत कुमारस्वामी (देवेगौडा पण धोब्याच्या भूमिकेत फिट्ट बसतील )  आणि सीतेच्या भूमिकेत येड्डी दिसू लागले. या धोब्याला शपथ घ्यायला काय भीती होती ? नुसती शपथच तर घ्यायची होती.   हां आता अग्निदिव्य असते तर त्या धोब्या प्रमाणे हे गृहस्थपण आरोप करून गप गुमान बसले असते... येड्डी मात्र एकदम तत्त्वाचा माणूस...एखादा डामरट राजकारणी असता तर सरळ खोटी शपथ घेऊन मोकळा झाला असता. येड्डी नि मात्र अजिबात शपथ घेतली नाही. लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करून मोकळे  झाले. या पत्रकारांना पण फार चौकश्या आणि येड्डी च्या खरेपणा बद्दल शंका. येड्डी नि प्रांजळ पणे सांगून टाकले की नितीन गडकरी नि सांगितले की राजकारणात देवाला आणू नका म्हणून मी असली शपथ घेतली नाही. गोवंश हत्या बंदीचे आंदोलन, कारसेवा, 'ज्वाला मालिनी ' साध्वींची प्रचार  भाषणे .... सगळे आठवले ..आणि आता हा देव आणि राजकारण वेगवेगळे ठेवण्याचा आदेश....बहुतेक येड्डी चा राँग नंबर लागला असावा.

रेव्ह पार्टी  मध्ये सापडलेला अमली पदार्थ विरोधी पथकाचा निरीक्षक म्हणतो आहे की मी तर कारवाई करण्या साठीच गेलो होतो. उगाच पोलिसांनी मला पकडले. शंकराने  हलाहल विष पिऊन संपवले या वर साहेबांचा विश्वास असावा आणि म्हणूनच ते ड्रग्स चा साठा कसा संपत चालला आहे हे आनंदाने बघत  उभे होते. अमली पदार्थ  विरोधी दिन याच आठवड्यात साजरा होत असताना कुठला जबाबदार अधिकारी गैरवर्तन करेल ? पत्रकारांना मात्र 'भांगेच्या झाडाखाली उभे राहून दुध पिणाऱ्या  माणसाची ' गोष्ट अजिबात माहित नसावी. बिचार्या निरीक्षकाचा मोठा फोटो वर त्याचे निलंबन  आणि त्या 'समज' देऊन सोडलेल्या २९० धनिक बाळांच्या नावांचा  उल्लेखही नाही. 'राडा रॉक्स' च्या चिरकुट नट कंपनीची  मात्र बातमी सह पूर्ण प्रोफायील ! येह इन्साफ नाही हुआ  ठाकूर ....

मिनिषा बिपाशा अनुष्का अशा 'शा'कारांत पडेल नट्यांना कुणी लाखो रुपयांचे दागिने उधार घालण्या साठी देत असेल यावर माझा विश्वास बसत नसला तरी कष्टम अधिकार्यांचा बसला आणि तेच महत्त्वाचे .. अनुष्का शर्माची आठ तास कसून चौकशी केल्यावर कुणाचाही विश्वास बसेल की. अनुष्का शर्मा नामक नटीचे कर्तृत्व रणवीर सिंघ ने (आता हा कोण ? असा प्रश्न मला पडला ) आयफा मध्ये सांगितले. त्याला कसले तरी बक्षीस मिळाले. आभाराचे भाषण करताना तो म्हणाला "थान्क्स अनुष्का ...यु मेड मी सो s s s hot !" माझ्या पुणेरी काकदृष्टीतून या वाक्याचे विविध अर्थ लावत असताना , माझ्या हातात पेपर होता तरी चेहऱ्यावर 'कणेकरी'  वाचत असल्यासारखे हसू पसरले....

बुधवार, २२ जून, २०११

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या

सकाळी वर्तमानपत्र वाचता वाचता उठलो ...'अश्विनी ...बच्चानांच्या कडे 'बातमी' आहे ' मी म्हणालो....बिग बी ने ट्विट केल्याची छापून आलेली  बातमी मी तिला दाखवली...'अभिनंदन !!' तिने असे म्हटल्यावर मी बावचळलो  ..."अरे मामा बनलास की तू ...!" तिच्या या उद्गारांनी  मात्र मी खरच मामा बनलो....
बस मधून जाताना कधी नव्हे ते एफ एम ऐकत होतो ...तिथे पण ऐश्वर्याच्या  नव्या जुन्याचाच (आता दिवस जाण्याला 'काही नावे जुने' असे का म्हणतात ते मला कधीच कळले नाही)  विषय चालू होता. संवाद एकदम मस्त होता...कुणी तरी एफ एम ला फोन लावला होता....
आर जे - हां.. तो कैसा  लागा आपको ये न्यूज  सुनके ?
(मला वाटले तो दस्तुरखुद्द ऐश किंवा अभिषेकबाबा ला विचारतोय की काय. पण प्रश्न होता एका श्रोत्याला...)
श्रोता - बहुत ख़ुशी हुई
(का रे बाबा तुझं जुहू ला नर्सिंग होम आहे का? )
श्रोता - बहुत दिनोसे इंतेजार था इस न्यूज का
(ऐश ची एवढी काळजी..समोर बघ लेका  बायको कशी डोळे वटारून बघत असेल )
आर जे  - और आप क्या केहना चाहेंगे ?
(बहुतेक 'यह शुभदिन बार बार आये' असा तारेचा मजकूर तर वाचणार नाही ना? )
श्रोता - बच्चन जी को शुभकामना , अभिषेक को भी शुभकामना , ऐश्वर्याजी को शुभकामना ..जयाजी को भी शुभकामना
माझ्या डोळ्यासमोर बच्चन कुटुंबीय या शुभाकामनांच्या   ओझ्याने दाबून गेल्याचे दृश्य दिसू लागले. प्रत्यक्ष  बिग  बी डोळे पुसत उभे आहेत असाच प्रसंग उभा राहिला.  पुढची पंधरा मिनिटे दोन गाणी आणि ऐश चे अडतिसाव्या वर्षीचे गर्भारपण यात कशीबशी काढल्यावर दुसरा चानेल लावला तर तिथेही  तेच पुराण......पुढचे दहा महिने आपल्या पुढे  काय वाढून ठेवले आहे याची एक झलक माझ्या डोळ्या समोरून जाऊ लागली....
पुढच्या आठवड्यात चर्चा चालू होईल की नक्की कितवा महिना चालू आहे . तिने कुठल्या फिल्म चे शुटींग चालू असताना कैरीचे लोणचे मागवले होते या बद्दल एखादा केटरर माहिती देईल. डान्स च्या अवघड स्टेप करायला तिने कसा नकार दिला होता याची माहिती कुणी नृत्य दिग्दर्शक लाडेलाडे सांगेल. मग एक ओपिनियन पोल ठेवू यात. किती महिने झाले असतील बरे....त्यात दीड महिना झाला असावा असे मत पडले की दुसरा चानेल लगेच..'चोरचोळी की साडी खरीदते हुई दिखी जयाजी ...' अशी बातमी सोडून देतील.... 
शोध पत्रकारिता करणारे चानेल बहाद्दर ऐश्वर्याच्या बालपणी तिला आंघोळ घालणाऱ्या वृद्ध दाई ला पकडून उभे करतील..'तुम्हाला आता पण बोलावले आहे का?' म्हणूनही विचारतील. ऐश चा सध्याचा आहार  काय आहे यावर  एक प्रकाशझोत  टाकला  जाईल . तुम्हाला जर  अडतिसाव्या  वर्षी  बातमी द्यायची  असेल तर काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन (खरं तर काळजी घेतली नाही तरच 'बातमी' देता येईल ) यावर हलो सखी मध्ये एक फोन इन कार्यक्रम असेलच.
अभिषेक सिद्धी विनायकाला जायला निघाला की त्याचा जलसा पासून प्रभादेवी पर्यंत लाईव्ह   कव्हरेज . मध्येच त्याला प्रश्न " इस सब में गणेश जी  की कृपा है ऐसा आपको लागता है क्या? ' त्याने हो म्हटले की लगेच ..'देखिये...जहान आजकाल पाचवी कक्षा के बच्चोंको पुनरुत्पादन   प्रक्रिया के बारे में सिखाया जा राहा है  है वोही इतने बडे लोग भी अंध विश्वास का शिकार हो रहे है ' असे म्हणून एक नवा वाद निर्माण केला जाईल.
सहावा सातवा महिना चालू झाला की स्पर्धांना बहार...लक्स च्या नव्या लक्समध्ये (कधी जुना लक्स पहिला आहे?) ऐशच्या डोहाळे जेवणाचे एन्ट्री कुपन सापडेल. एखाद्या टी व्ही चानेल वर डोहाळे जेवणाच्या  वाडी चे फुलांचे दागिने बनवण्याची स्पर्धा आणि विजेत्याला ऐशाच्या हस्ते लाडू किंवा पेढा (ती जे काही निवडेल ते बरं का ). मुलगा होणार की मुलगी  याचा अंदाज बांधणार्या एस एम एस स्पर्धा. बाळाच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज सांगण्यासाठी  अजून एक स्पर्धा.
ज्योतिषी , अंक शास्त्री , टारो कार्ड वाचणार्या मोट्ठे कुंकू लावणाऱ्या अति  भव्य भविष्यवेत्त्या  यांचा एक परिसंवाद . काय होईल, कसे होईल आणि कधी होईल या वर....... बघायला विसरू नका . कारण 'ते' झाले की यांच्याच मोठ मोठ्या जाहिराती लागतील...बघा मी सांगितले होते की नाही...तस्सेच झाले. छोटा बी किंवा छोटी बी जन्माला आली की यांची नाव ठेवण्या वरून लगबग , भविष्य सांगण्याची घाई...
हे सगळे खोटे वाटते आहे का? की मी 'सुटलो' आहे असे वाटतेय? जरा आठवून पहा....ऐशा च्या राशीतला तो मंगळ ...त्याची शांत..ते तुळशी बरोबरचे लग्न सगळ्या बातम्या आठवतील....एक नवी भूल देण्यासाठी सगळे तयार   आहेत....तुम्ही फक्त  ऐकत राहा ....२जी , ३जी , लोकपाल , काळा पैसा, कानिमोली, कलमाडी   ....सगळ्याचा विसर पडेल तुम्हाला राव....

शनिवार, १८ जून, २०११

आता किती झोडाल त्या "बालगंधर्व​" ला??


बाल गंधर्व चित्रपट प्रदर्शित झाला आणि रात्रीच सुहास चा मेसेज थडकला. चित्रपट अप्रतिम , सुबोध भावे अप्रतिम ..आम्ही पण दुसऱ्या दिवशीचे तिकीट काढलेच होते ..झकास बनली आहे फिल्म...गंधर्वांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना , चढ उतार, यश आणि अपयश असे सगळे रंग दाखवत मराठी माणसाला एका अद्वितीय कलाकाराचा  पुनः परिचय घडवून देणारा  हा चित्रपट बघताना जी मजा आली ती काय वर्णावी...आश्चर्य  वाटले ते गेल्या काही दिवसात छापून  येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून. वेगवेगळ्या माध्यमात लिहिणाऱ्या समीक्षकांनी (खरे तर टीका करणार्यांनी) जे लिहिले आहे ते वाचून.

किती टीका करावी आणि कशावर करावी...चित्रपटाचे एकही अंग असे नाही की ज्यावर या लोकांनी टीका केलेली  नाही. आणि कारणे तरी किती चित्र विचित्र . एकाने नाटक कंपनीतल्या शेल्फ  वर वाद्ये ठेवली म्हणून कौतुक केले तर दुसर्याने लगेच .' त्या काळी मोठ्या  तोंडाचे तबले असायचे इथे तर छोटेच तोंड आहे ' असे म्हटले. नाही म्हणायला तबल्यालाही तोंड असते आणि म्हणूनच  'तोंड वाजवणे' वाक्प्रचार  निघाला असावा अशी आमच्या ज्ञानात भर पडली. 

टिळकांच्या भूनिकेतले नितीन देसाई शोभत नाहीत, गंधर्व पदवी मिळाली तेव्हा नारायण बारा वर्षांचा होता , चित्रपटातला मुलगा अजूनच लहान दिसतो. गाणे म्हणताना कवळी पडलेले गंधर्व म्हातारे दिसतात पण त्या नंतर 'धर्मात्मा' मध्ये काम करताना  त्या मानाने तरुण वाटतात. गंधर्वांच्या तोंडी शेक्सपियरचे वाक्य आहे. गडकर्यांचे हवे होते. गांधारावानी शेक्सपियर वाचल्याचा उल्लेख नाही.

गंधर्वांची एन्ट्री अशीकशी घेतली? त्या काळी नांदी मध्ये काय कोकणातल्या दशावतारी सारखा गणपती थोडाच नाचायचा ? गंधर्वांचा जन्म १८८८ मधला. म्हणजे १९३० साली ते वयाच्या चाळीशीत पोचले होते. आज त्यांची सुवर्णकाळातील  नाटके पहिली म्हणणारे वृद्ध त्या काळी शाळकरी मुले असतील. म्हणजे जे काही टीकाकार लिहित आहे त्यांनी पण ते कुणाच्या सांगीवांगी  वरून किंवा कुणाच्या लिखाणावरून संदर्भ घेऊनच  . मग चित्रपट बनवणार्या टीम ने हे संशोधन केले नसेल असे का सूचित करायचे ?

सध्या तर गंधर्व काळाबद्दल लिहिणाऱ्या तज्ञांचे पीक आले आहे. १९८८ मध्ये गंधर्व जन्म शताब्दी वर्षात गन्धर्वांबद्दल बोलणार्या  लिहिणाऱ्या लोकांनी इतका अतिरेक केला  होता की  (बहुतेक) मंगेश तेंडुलकर यांनी एक व्यंग चित्रमाला काढली होती. मला एक व्यंगचित्र  लक्षात राहिले आहे .... पाठीमागे पुण्यातल्या एका शिशुविहारात घेतलेली 'गंधर्व अनुभव कथन स्पर्धा ' असा फलक आणि माईक पाशी  उभा असलेला  एक चड्डीतला  चिमुरडा म्हणतोय ',,आणि नाना गायला उभे राहिले की काय सांगू ...'

गाण्याची  निवड  चुकलीच . 'जोहर मायबाप'  का घेतले नाही म्हणून कुणी हंबरडा फोडला. मला एक खात्री आहे की जर ते पद घेतले असते तर ' गंधर्वांची इतर अप्रतिम पण फारशी माहित नसलेली पदे का घेतली नाहीत' हे  नक्कीच कुणी तरी पाजळले असते. आनंद भाटेनि काही खास नाही गायले बुवा...आनंद भाटेनी हुबेहूब तसेच गायचा आग्रह कशाला ? मग गंधर्वांचे  रेकॉर्डींगच वाजवले असते की दिग्दर्शकाने.

त्या काळी संगीत नाटकात  दागिने एवढे घालायचेच नाही म्हणून एकाने लिहिले. मग गंधर्व ' सोन्याचे पाणी देण्यात ' पाण्यासारखा पैसा घालवायचे असे कुणी का लिहिते बरे? समाजावर गंधर्वांचा प्रभाव नीट दाखवला नाही . फक्त एक कलेक्टर ची पत्नी गंधर्व पद्धतीचे शालू घेताना दाखवली आहे. अहो मग दाखवावे तरी कसे? तत्कालीन अभिजन वर्ग गंधर्व पद्धतीने सजण्यात धन्य मानू लागला होता हे दाखवले की दिग्दर्शकाने .

एक टीकाकार तर त्यांच्या नातेवायीकांचा , ज्यांनी गंधर्व नाटक मंडळीत काम केले होते , चित्रपटात उल्लेख नाही म्हणून व्यथित  झाले. आता दिग्दर्शकाने तरी  कुणाकुणाची मर्जी सांभाळावी ?

गंधर्वांच्या ७९ वर्षांच्या आयुष्यात गोहर बाई २६ वर्षे होत्या . हा गंधर्वांचा उतार काल जास्ती तपशीलात  दाखवायला हवा होता , गोहरबाईनि जो त्रास दिला तो ठळक पणे दाखवला नाही, गोहरबाई चे चित्रीकरण इतक्या वर्षांनी एक प्रेयसी म्हणून दाखवले असते तर काय बिघडले असते? एक ना दोन ...अनेक आक्षेप

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक घटना असतात शिवाय त्यात गन्धर्वान्सारखी  जनतेमध्ये लोकप्रिय असणारी  व्यक्तिरेखा. पटकथाकाराने  तरी काय काय  दाखवायचे ? चरित्र नायकामध्ये काही दोष दाखवलेले  भारतीय लोकांना चालत नाहीत.  नायक कसा गुण संपन्न हवा. सध्या तर समाजमन दुखावण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की गंधर्वांचे काही दोष दाखवले असते तर कुठल्या तरी ज्ञाती मंडळाने नक्कीच निषेध मोर्चा काढला असता. अहो इथे उद्या औरंगजेबवर चित्रपट काढला तरी त्यात  मुलांच्या शिक्षणात  व्यत्यय येतो म्हणून औरंगजेबाने नाच गाण्यावर बंदी आणली, शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी त्यांना आग्र्यात ठेवले होते  असेही दाखवतील. उगाच कुणा समाजाचा  रोष नको बुवा. त्यामुळे 'बालगंधर्व'  मध्ये अप्रिय घटना  फार दाखवल्या नाहीत  याचे काही विशेष वाटले नाही

एका मर्यादित वेळेत चित्रपट पूर्ण कार्याचा असेल तर लेखक दिग्दर्शक आपला काही फोकस ठेवून प्रसंग व्यक्ती यांची निवड करतात. परिपूर्ण कलाकृती ही फारच दुर्मिळ चीज आहे. एखाद्या गोष्टीवर भरपूर टीका होणे सुद्धा तिच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे... अहो दखल घेण्या सारखे काही तरी आहे की त्यात.,,काही म्हणा बालगंधर्व ही काय  चीज होती, संगीत नाटकांची दुनिया कशी होती , प्रेक्षकांच्या मनोरंजनाला सर्वोच्च प्राधान्य देणारा कलावंत कसा असतो याची नव्या पिढीला ओळख करून देणारा हा चित्रपट ....'असा बालगंधर्व आता न होणे '....

शनिवार, ११ जून, २०११

सुट्टी - एक न घेणे

माझ्या एका मित्राने मस्त ब्लॉग  लिहिलाय. विषय आहे भारतीयांच्या काम करण्याच्या वाईट वाईट सवयी...आता हे वाचून कुणी म्हणेल की आपल्या कडे लोक काम करताना कुठे दिसतात...काम करत असते तर आपला अमेरिका नसता झाला का? विनोदाचा भाग सोडून दिला तरी आपल्याकडे लोक भरपूर काम करतात, "वर्कोहोलिक" म्हणावे असे सुद्धा लोक आसपास दिसतात...विशेषतः प्रत्येकाचा बॉस हा वर्कोहोलीकच  असतो...गेल्या पाच सहा महिन्यात दोन तीन मोठ्या भारतीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांचा अकाली मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. जुने लोक दरडावून म्हणायचे 'काम केल्याने काही जीव जात नाही' हे खरे असले तरी त्या कामातून येणाऱ्या तणावाने जीव नकोसा होतो...काहीवेळा जातो पण. निदान  या वर सहमती होण्यास काही हरकत नसावी....

गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक तणाव या विषयावर बरेच मंथन आपल्या वृत्तपत्रामधून चालू असते . तणाव कमी करण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जातात उदा. फिरायला जा, ध्यान  धारणा करा , कुटुंबासोबत वेळ घालवत जा, हे सगळे करून बघायचे तर वेळ कुठे आहे रे? इथे सुट्टी कुणाला मिळते? असे प्रश्न कानावर येतात. काही खोटे नाहीये..भारतीय व्यवस्थापनाने काही अनिष्ट चालीरीती पाळणे चालू ठेवले आहे. उशिरा पर्यंत बसण्याला कामसूपणा म्हणणे , साहेबांच्या चुका दाखवून न देण्याला टीम प्लेयर म्हणणे  (दाखवल्या तर तुम्हाला फार  'attitude' आहे म्हणून शिक्का बसू शकतो) या गोष्टी आय टी उद्योगांमध्ये पण अजूनही चालू आहेत. यातलीच एक खटकणारी गोष्ट म्हणजे सुट्ट्या न घेणारा हा 'समर्पित' (dedicated) कामगार आणि त्याच्या सुट्ट्या न घेण्याबद्दल बक्षीस म्हणजे रजेचा पगार देण्याची पद्धत. बँकेत आपल्या वर्षानुवर्षे न घेतलेल्या रजांचा हिशोब करत बसलेले भरपूर लोक पाहिलेत.

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या  मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची   कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का ? बाकीचे काही काम करत नाहीत ? " मी विचारले...
"काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर  पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले .
" तीन आठवडे सुट्टी घे"मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू ? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे . घरी पडे रहो कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण  , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने  काय होईल; ? "
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास  तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस  चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.

माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून  "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची  भावना  हे पण काही जणाच्या    सुट्टी न घेण्या  मागचे   कारण  असू  शकते  .

पाश्चात्य  देशातील  काही चांगली  व्यवस्थापन  तत्त्वे  आपण  उचलली  पाहिजेत . तिथे  सुट्ट्या कमी  असल्या  तरी त्या  घेतल्याच   पाहिजेत  असा दंडक   असतो . रजा विकणे , साठवून  ठेवणे , पेन्शनीत  वर्ग  करणे असले  प्रकार  नसतात . माणसाला  विश्रांतीची  गरज असते आणि त्या  साठी  रजा ही घेतलीच  पाहिजे  असा स्पष्ट  आग्रह  तिथे  असतो . आपले  म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी  त्यांच्या  सोयीच्या  आणि पगार  जास्तीत  जास्ती  वसूल  कसा  करता  येईल  अशाच  गोष्टी  उचलल्या  आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा  , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो"  म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान  रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो. 

सांगायचा  मुद्दा  काय  की  आपण  काही  तरी  लंगड्या  सबबी  सांगून  रजा घेण्याचे  टाळतो . कुटुंब  आणि  स्वतःला  जो  वेळ  द्यायचा  तो  देत  नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला  आहे ते कळत  नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...माझे ऐका...एक सुट्टी घ्या...